Saturday 24 October 2009

गझल.....




मी तर सावज, तूच शिकारी, अचूक धरशी, नेम सखे
एक नजर, पडताच तुझी ती, होतो माझा, गेम सखे



सदैव कामे, तुला आणखी, सदैव प्रॉब्लेम, तुझे नवे
टाळण्यास मज, तू जे देसी, ते तर एक्सक्युज, 'लेम' सखे



एक फोनही, कधीतरी अन्, भेटतेसही, कधीतरी
समजावे मी, कसे तुझे की, आहे मजवर, प्रेम सखे?



पैसा अडका, इमला गाडी, मला न त्याची, आसक्ती
दौलत माझी, तूच सखे गं, तूच खरोखर, हेम सखे



कोहिनूर वा, असो कुणीही, मला न कौतुक, त्याचेही
तुझ्यारुपाने, मला लाभला, अमूल्य किमती, 'जेम' सखे



तुला भेटण्या, नको अडथळा, म्हणून केला, खर्च किती?
नवीन आला, कॉम्प्युटर हा, नवीन बघ मॉडेम सखे



नको दुरावा, नको अबोला, नकोस अंतर, देऊ तू
कोण चालवी, तुझ्यावाचुनी, माझा योगक्षेम सखे?



आपला,
(काव्यात्मक) धोंडोपंत

Saturday 18 July 2009

मूर्तीसम मी असे स्वयंभू

मूर्तीसम मी, असे स्वयंभू, कुणी नसे घडवले मला
तरी सांगती, हक्क लफंगे, कुणी कुठे शोधले मला

कुंभेचा शनि, लग्नी माझ्या, घट ज्ञानाचा, भरलेला
मंथन करुनी, स्वतःच त्याने, अमृत हे पाजले मला

किती तोतये, मला भेटले, श्रेय यशाचे, लुटणारे
कशास आता, हिशोब ठेवू, कुणी किती ठकवले मला

मोगर्‍यापरी, प्रीतफुलांची, उधळण केली, सदैव मी
सांग कधी वेचले मला तू, सांग कधी माळले मला?

तुझा दुरावा, म्हणजे केवळ, वाळवंट हे, रखरखते
बरसलीस का, मेघ होउनी, सांग कधी भिजवले मला?

"पूर नदीला येतो आहे" ओरडून मी, सांगितले
दखल घेतली, कुणी न माझी, तुम्ही कधी ऐकले मला

आण संकटे, अजुन विधात्या, हारणार ना, कधीच मी
नियती हा इतिहास वाच तू,...... कुणीच ना जिंकले मला

आज अचानक, भेटलीस तू, हासलीस ही, त्यावरती
व्रतवैकल्ये, फळली बहुधा, देव कसे पावले मला?

"कोवळीक हळवेपण आणिक, निष्ठुरतेची परिसीमा"
"सद्गुण अवगुण तुझे 'अगस्ती', सारे हे भावले मला"

........................................................

रचनाकाल:- दिनांक १४/०७/२००९, उजाडता मंगळवार,

मध्यरात्री १.३०,

दादर, मुंबई


Saturday 13 June 2009

घन पाठव आता कृष्णा....



घन पाठव आता कृष्णा
निष्ठूर नको होऊस
मी डोळे लावुन बसलो
येणार कधी पाऊस....

हा असह्य आहे उष्मा
पोळतोय माझा गाव
घन पाठव आता कृष्णा
तडफडतो आहे जीव...

झाल्यात कोरड्या सरिता
घन पाठव आता कृष्णा
तू अंत किती बघशील
गावाची भागव तृष्णा....

घन पाठव आता कृष्णा
गावात थेंब ना उरला
पायपीट कळशी घेउन
करतात चिमुकल्या बाला.....

बघ मलूल पडल्या गाई
चाराही संपत आला
घन पाठव आता कृष्णा
पारिजात वाळुन गेला....

घन पाठव आता कृष्णा
एवढेच माझे ऐक
पूजेला नाही पाणी
घे अश्रूंचा अभिषेक...

आपला,
(हवालदिल) धोंडोपंत

जाता जाता

जिथे तिथे मी हर्ष पेरला... जाता जाता
आनंदाचा मळा फुलवला... जाता जाता

समोर तू येताच अचानक मी गडबडलो
एकच ठोका हृदयी चुकला... जाता जाता

दोन शेर लिहिल्यावर होती गझल रखडली
तू दिसल्यावर तिसरा सुचला... जाता जाता

असा काय गंभीर गुन्हा मी केला आहे?
एकच चिमटा तुला काढला... जाता जाता

तुझे इशारे तुझ्या खुणा लाजवाब होत्या
अर्थ मला पण उशिरा कळला... जाता जाता

हासत खेळत भेट आपुली झाली तरिही
कंठ का बरे तुझा दाटला... जाता जाता

खूप प्रयासाने थोपवले होते अश्रू
बांध शेवटी उगीच फुटला... जाता जाता

"संवादाची तुझ्या ’अगस्ती’ ही तर किमया"
"रडणाराही अखेर हसला... जाता जाता"

Thursday 4 June 2009

काळजी नको

आहे जरी नवा प्रवास.... काळजी नको
वावर तुझाच आसपास.... काळजी नको


हुरहूर खंत शल्य वेदना पुरे अता
मी रोज सांगतो मनास... "काळजी नको"


मारावयास योजना करू नका तुम्ही
लावीन मी स्वत:स फास.... काळजी नको


देतात लोक त्रास नेहमीच हे मला
जातील व्यर्थ हे प्रयास.... काळजी नको


हे कोण बोलले तुम्हांस मी शिवी दिली?
मी योजलाय फक्त प्रास... काळजी नको


आता तुझ्यावरीच भार टाकला असे
आता असे तुझाच ध्यास... काळजी नको


माझ्या रितेपणास राहिलेय घर कुठे?
हृदयी अता तुझा निवास.... काळजी नको


आहे दिगंत प्रीत अन्‌ अथांग ही कथा
लिहिण्यास जन्मतील ’व्यास’ ..... काळजी नको.